Wednesday, May 10, 2017

सोनू निगम आणि देशात वाढत चाललेली धार्मिक कट्टरता


सोनू निगम आणि देशात वाढत चाललेली धार्मिक कट्टरता
- प्रमोद शिंदे
प्रसिद्ध गायक सोनु निगम याने केलेल्या ट्वीट मुळे आज सगळीकडे चर्चा आणि वादविवाद सुरू झालेले आहेत. यात काही कट्टर मुस्लिम खवळलेत तर काही कट्टर हिंदू धर्मीय सुखावले आहेत. सोनू निगम याने दिनांक १७ एप्रिल रोजी भल्या पाहटे ५.४५ वाजता ट्विटर वरुन "सगळ्यांना देव सुखी ठेवो. मी मुस्लिम नसूनही मला रोज पहाटे अजानच्या ध्वनीवर्धकावरून येत असलेल्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे? असा सवाल केला होता.
सोनू निगम यांच्या ट्विट च्या घटनेनंतर आणि त्यानंतर सर्व प्रसिद्धी माध्यामातून सुरू असलेल्या चर्वविचर्णातून मला माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आठवला. माझे लहाणपण माटुंगा लेबर कॅंप या धारावीजवळील वस्तीत गेले. आमच्या घराजवळ एक मस्जिद होती. माझी बारावीची परिक्षा सुरू असल्याने मी भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसत असे आणि मुस्लीम कॅलेंडर नुसार रमझान चा महिना इंग्रजी कॅलेंडमधील मार्च महिन्यात आलेला होता. रमझान चा महिना असल्याने मस्जीदीवर दिवसातून चार ते पाच वेळेस अजान घेतली जायची. त्यामुळे माझ्या अभ्यासात मला त्रास होतोय अशी माझी भावना तयार झालेली होती. म्हणून मी एकदा सहजासहजी माझ्या अगदी जवळच्या मुस्लीम मित्राला माझी भावना बोलून दाखविली होती. परंतु याचा परिणाम वेगळाच झाला, आमच्या वस्तीतील जब्बार नामक गुंड अगदी जुनी मळलेली तलवार घेवूनच माझ्या अंगावर आला, माझ्या गळ्यावर ती ठेवत म्हणाला, "इसके आगे हमारे कौम के खिलाफ अगर कुछ कहा तो यही काट दूंगा, तु शिंदे का लडका है ना? मी होकार दिल्यावर म्हणाला, "तु शिंदे का लडका है इसलिए छोड रहा हू " माझ्या मनात कसलाही धार्मिक द्वेष नसतानही फक्त मनातील प्रामाणिक इच्छा बोलून दाखविल्याबद्दल मला हे सोसावे लागले होते. माझे वडील कधीही कुणाच्या अध्यात किंवा मध्यात न पडणारे, आपली नोकरी आणि घर भले अशी वागणूक असल्याने मी त्यांच्या याच पुण्याई मुळे वाचलो होतो.
सोनू निगम हा काही अगदी माझ्यासारखा काहीही समजत नसलेला शालेय विद्यार्थी नसल्याने त्याने केलेल्या ट्विट मागे त्याची काय भावना किंवा भविष्यातील नियोजन काय असावे हे त्याच्याशिवाय दुसरा कोणीही सांगू शकत नाही. परंतू त्याच्या ट्विट मधील वाक्य जसे, "मी मुस्लीम नसतानाही मला रोज अजानच्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे. या दोन्ही मुद्द्यांशी मी पुर्णतः सहमत आहे" कारण धर्म ही माणसाची वैयक्तिक गरज आहे. धर्म कधीही देशाची गरज होवू शकत नाही. धर्म राज्याची, शहराची किंवा समाजाची गरज होवू शकत नाही. माझे तर असेही म्हणणे आहे की, धर्म कधीही एखाद्या समस्त कुटुंबाची सुद्धा गरज होवू शकत नाही. कारण एकाच कुटुंबात वेगवेगळ्या धर्माला किंवा आचारसरणीला माणणारी लोक असू शकतात. त्यामुळेच देशापेक्षा धर्म कधीच मोठा असू शकत नाही. अगोदर देश , मग राज्य , मग आपण ज्या शहरात राहतो ते शहर, नंतर आपले नगर, मग समाज, मग कुटुंब आणि कुटुंबानंतर कुटूंबातील व्यक्ती आणि सर्वात शेवटी त्या व्यक्तीची गरज आणि आवड मग ती विचारांची असू किंवा खाण्यापिण्याची आणि त्यासाठीच त्या व्यक्तीने आपण जे खातो आहोत त्याची आणि आपण जे पाळतो आहोत तो धर्म किंवा आचार इतर कोणावरही लादू नये, ज्या प्रमाणे आपण समजतो की, समाजात स्वतःचे विचार एखाद्यावर लादणे, किंवा आपण जसे वागतो आहोत तसेच इतरांनीही वागवे अशी जबरदस्ती करणे चुकीचे मानतो, अगदी आपल्या आईवडिलांनी आपल्यावर लादलेले नियम ही आपल्याला चुकिचे वाटतात तर मग आपल्या धर्माचे प्रदर्शन मांडून ते एखाद्यावर लादणे कसे काय चांगले असू शकते. मला मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवतो , "साकी मुझे मस्जिद बैठकर शराब पिने दे, वरना ऐसी जगह बता जहा खुदा नही है" देव जर चराचरात वसलेला आहे तर मग त्याचे भव्य आणि इतरांना त्रास होइल असे प्रदर्शन मांडणे चुकिचे नाही का? धर्माचे प्रदर्शन मांडणे हे चुकीचेच आहे मग ते मुस्लीमामधील मस्जिदीवरील भोंगे असू दे किंवा सार्वजनिक रस्ता बंद करून त्यावर नमाज पडणे किंवा गणेशोत्सव, रामनवमी आणि इतर सणांच्या नावावर रस्ते बंद करून मोठ्याने धर्माचे प्रदर्शन करणे असू देत. अगदी बौद्ध समाजामध्ये प्रकार सुरू झालाय १३ एप्रिल च्या रात्री आणि १४ एप्रिल रोजी सार्वजनिक रस्ते बंद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्बिरीची हिन्दी आणि मराठी चित्रपटाच्या गाण्यावर धांगडधिंगा करित मिरवणूक काढणे हेही चुकिचेच आहे. देव, देश आणि धर्म कधीही एकत्र असू शकत नाही, त्यामुळेच ज्या शांता शेळके यानी हे "देव देश अन धर्मासाठी प्राण घेतले हाती" हे लिहलय ना, ते अगदी विकृत बुद्धीने आणि स्वधर्माबाबत कट्टरता वाढून इतर धर्माबाबत धार्मिक राग निर्माणासाठीच लिहले आहे हेच दिसून येते.
आज भारतातील नागरीकांमध्ये वाढत चाललेली धार्मिक कट्टरता या देशाला अधोगतीकडे घेवून जात आहे. धर्मांध लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या धर्माचे प्रदर्शन करित इतरांनाही ते जबरदस्तीने पाळायला भाग पाडतात. आता इथे जबरदस्ती कशाची तर, आम्ही ऐकतो तीच देवाची आरती किंवा अजान तुम्ही ही ऐकावी आणि आम्ही गायीला देव माणतो तर तुम्हीही मानायला हवे किंवा आम्ही शाकाहरी आहोत तर तुम्हीही शाकाहार स्विकारावा, आमच्या देवासाठी तुम्ही थोडे चालत जा किंवा तुमचा रोजचा रस्ता बदलवा अशी जबरदस्ती करणे. हेही धर्म इतरांवर आपला धर्म लादण्याचेच प्रकार आहेत.
संत शिरोमणी संत तुकाराम आपल्या अभंगातून सांगत,
" कोणाही जीवाचा न घडावा मत्सर,
वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||
एखाद्याही इतर जीवाला त्रास होवू नये, अशी वर्तणूक असणे, हेच पुजनाचे किंवा देवाला प्राप्त करण्याचे हे खरे माध्यम आहे.
इथे शेवटी आपल्यात निर्माण झालेला गैरसमज दुर करणे गरजेचे आहे, भारतीय संविधान आपल्याला धर्म स्वातंत्र्य देते म्हणजे कोणताही धर्म आचरणात आणणाचे स्वातंत्र्य देते आपला धर्म इतरांवर लादण्याचे स्वातंत्र्य देत नाही.
- प्रमोद शिंदे, मुंबई
(९९६७०१३३३६)