Tuesday, August 11, 2020

ये कृष्णा, ये कान्हा कोण रे तू?

कृष्णाला माझ्या नजरेतून पाहिल्यावर मला जसा कृष्ण  दिसला तसा मी खालील कवितेत मांडलाय. 

ये कृष्णा, ये कान्हा 
कोण रे तू? 
म्हणे तू विष्णूचा अवतार आहेस,
तू विष्णूचा अवतार असूच शकत नाही, 
जो बायकोला पायाशी ठेवून जवा बघावं तेंव्हा कमळाच्या गादीवर  लोळत असलेला, 
तिने याचे पाय चेपत राहावे आणि हा दुनियेला दुनियादारी सांगत बसलेला, 
तू असा निष्क्रिय विष्णू असूच शकत नाही, 
तू तर गवळ्याच्या झोपड्यात बागडणारा नंदलाल, 
गुराढोरांच्या मागे  धावणारा गोपाल, 
दादा बलरामासोबत नांगर चालवणारा, 
शेती करणारा शेतकरी तू, 
दूध काढून घराघरात पोहचविणारा गवळी तू, 

काही नालायक कथाकारांनी आम्हाला सांगितले, 
तू आंघोळीला गेलेल्या गवळणीचे, 
कपडे पळवून नेत असे, 
अरे हट,
अरे ज्याने कोण कुठल्या द्रौपदीचे शील वाचविण्यासाठी, 
तीच्या अंगावर कापड टाकले, 
तो कान्हा आपल्याच गवळणीचे कपडे, 
पळवणारा असूच शकत नाही, 
तू तर जातिव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटणारा, 
अठरा पगड जातीच्या गोपाळांना  
एकत्र करून काला करणारा, 
सहभोजनातून समतेसाठी आंदोलन करणारा, 
रोटी व्यवहारातून वर्णवादाविरुद्ध लढाच होता तो, 
अन जेंव्हा तुझ्या याच लढ्याविरुद्ध सनातन्यांनी हल्ले केल्यावर सगळं संकट स्वतः झेलत दीनाना छत्रछायेखाली घेणारा 
गिरीधर तू, 
तू सांगितलेले गीतेचे सार वाचलेय मी, 
त्यात तू कुठेही चमत्कार करतोस असे लिहले नाहीस, 
तू तर त्यातून, श्रम, कष्ट, संयम, स्त्री सन्मान आणि समानता हेच सांगतो आहेस, 

काही मूर्ख कथाकारांनी तुझ्यावर लिहलेल्या चमत्काराच्या कथा बाजूला सारल्या ना की तू, 
तू एक युगपुरुष वाटावा असाच आहेस, 
जिजाऊनी शिवरायांना सांगितलेला, 
मावळ्यांत मावळा म्हणून खेळणारा सवंगडी आहेस, 
तू अचल आहे, 
तू बुद्धांचा अहिंसावादी शांतीप्रिय 
रणछोड आहेस, 
तू बिहारच्या रानावनात राहणारा, 
आदिवासी "बांके बिहारीं" आहेस
नदी पाण्यात कोळ्यांसह बोटी वल्हवणारा "वल्लभ" आहेस,
 "कुंज बिहारीं" आहेस. 
तू दीनांचा बंधू " दीनबंधू" आहेस, 
तू काळ्या केसांचा "केशव"आहेस, 
तू काळ्या रंगाचा "काला' आहेस.
तू अन्याय अत्याचारा विरुद्ध उभा राहणारा "करिकालन"आहेस, 
तू पांडुरंग आहेस, 
तू आमचा आहेस, 
ये कृष्णा, ये कान्हा, 
तू आमचा आहेस.

- प्रमोद शिंदे 
11/08/20

No comments:

Post a Comment