आज भारताचा स्वातंत्र्यदिन, मुंबईत असलो की, कुठे ना कुठे, व्याख्यानाला किंवा झेंडावंदनाला जात असे, पण लॉकडाऊन आणि शहरापासून दूरवर आज कसा करावा स्वातंत्र्य दिन साजरा असा विचार करत असताना, डोक्यात काही शब्द सुचले, पुढे ते वाढत मनसोक्त झाले,
आणि खालील पंक्ती तयार झाल्या... आवडल्यास नक्कीच कळवा..
आज म्हणे स्वातंत्र्य दिन,
देश स्वातंत्र्य झालाय,
ये गण्या उठ, तयार हो,
साळत जायचं,
झेंडावंदन हाय ना शाळंत?
ही बघ कापडं,
ये आये,
चड्डी ढुंगणावर फाटलीय,
शर्ट पन उसवलाय,
अरे जा, तुझ्या ढुंगणाच्या चड्डीला कोण नाय बघत,
सगळे झेंड्याला बघत्यात,
जा, आज स्वातंत्र्यदिन हाय,
देश स्वतंत्र झालाय,
ये लक्ष्मणा उठ,
चल लवकर चल,
रातच्याला मयंदाळ पाऊस झालाय,
सगळं बांध फुटलेत,
पिकं पाण्यात गेलीत,
चल लवकर चल,
शेतातून पाणी काढाय हव,
नव्याने बांध बांधायला हवं,
उठतो रे आबा,
हा सकाळ सकाळी भोंगा कसला?
गाणं वाजतंय, मेरे देश की धरती..
अरे आज स्वातंत्र्य दिन हाय,
देश स्वतंत्र झालाय नवं
ये कांते काय झालं,
काय नाय!
अगं बोल,
कालचा कस्टमर, मादरचोद
रातभर सगळं काय केलं,
पैसं मांगल्यावर मारलं कुत्र्यानं,
खूपच लागलंय,
थांब हळद लावते,
जाऊदे आपली जिंदगीच अशी हाय,
हे घे खा !
सुखा मेवा अन बर्फी,
कशा बद्दल, कोणी दिलंय?
आमदार सायबानी दिलंय,
आज स्वातंत्र्य दिन है,
देश स्वतंत्र झालाय ना!
ये बैला,
बघ तात्या कसा झोपलाय,
अन काकू का रडतेय?
ये बैला, झोपला नाय, मेलाय तो
पाऊस नाय, शेती नाय,
रातच्यालाच झाडाला लटकलाय,
मग आता पुढं?
काकू तुला इकल, मला इकल,
रस्त्याच्या सिग्नलवर पोरं पाठीला बांधून झेंडा पन इकल,
झेंडा काय असतो रे?
तुला एवढं पन माहिती नाय का बैला,
आज स्वातंत्र्य दिन हाय,
देश स्वतंत्र झालाय !
तुझ्या कर्जाचा हफ्ता नाय आला,
साहेब बँकेत चोरी....
मुर्खा, मी काय विचारतोय अन,
तुला बँकेत चोरी कशाला पाहिजे?
आमचे पेपर चोरीला नाय गेले काय?
पेपर कुठे जातील, अन चोरी कसली?
समदे म्हणत्यात चोरी झाली,
त्या रफाळा चे पेपर चोरले,
त्या दारूवाल्या माल्या चे पेपर चोरले,
त्या पुलवामा च्या सैनिकांचे पेपर चोरले,
आमचे काहून सोडले त्या चोरानं?
ते मला नको विचारूस,
हफ्ता भर,
सकाळी शाळेच्या पटांगणात ये,
झाडलोट करायचीय,
आज स्वातंत्र्य दिन हाय,
देश स्वतंत्र झालाय,
हो आज स्वातंत्र्य दिन हाय,
देश स्वतंत्र झालाय.
- प्रमोद शिंदे
15/08/20
चंद्रपूर,
No comments:
Post a Comment