Friday, August 5, 2016

आंबेडकर भवन, प्रकाश आंबेडकर आणि भव्य मोर्चा

आंबेडकर भवन, प्रकाश आंबेडकर आणि भव्य मोर्चा

२५ जुन च्या रात्री आंबेडकर भवन पाडण्यात आल्यानंतर आज पर्यंत मला अनेकांनी विचारले तुम्ही या विषयावर लिहा. काहीनी तर लिहायलाच हवे असा आग्रह धरला. काहिनी तर तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही समर्थक आहात असेही लचके दिले. परंतू मि त्यांना "वेट ॲंड वॉच" थोडे दिवस थांबा आपोआपच कळेल असे उत्तर देत आलो. आंबेडकर भवन पाडल्यानंतर माझ्या डोक्यात काही प्रश्न उपस्थित झाले.
१.छगन भुजबळ यांच्यावर झालेले आरोप मान्य केले तरी त्यानीं केलेले एक कार्य अगदी वाखाणण्याजोगे आहे.
पुण्यातील क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांचे वास्तव्य असलेला फुले वाडा ऐतिहासिक वास्तू घोषित करून तो जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यावर ज्योतिराव फुले यांचे येथे वास्तव्य होते असे दर्शवणारा फलक लावण्यात आला.
जवळच सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले. आज अनेक जन पुण्या
त गेले कि, या फुले वाड्यात जातात आणि सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांचे कार्य पाहून तिथेच भारावून जातात.
हीच गोष्ट मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या राजगृहाबाबत का घडत नाही?
याबाबत अनेक उत्तरे मिळाली. जशी कोर्टात केस आहे, वर पारशी राहत आहेत. खाली आनंदराज आंबेडकर राहत आहेत. काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर याना " तुम्ही बाहेर असा फलक का लावत नाही कि, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्यावर त्यानी दिलेले उत्तर असे, " आम्हाला ही वास्तू अशीच ठेवायची आहे." त्यावर फलक लावल्यावर त्याची शोभा निघून जाईल. ऐतिहासिक वास्तूवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते असा फलक लावल्याने वास्तूची शोभा जाते. हे कारण आहे कि, तसा फलक लावल्यास रोजचे रोज सतत अनेक जन आंबेडकर प्रेमापायी येत राहतील , आणि यामुळे तुमच्या खाजगी आयुष्यात अडथळे येतील हे कारण आहे. डॉ. बाबासाहेब हे तुमची वैयक्तिक मालमत्ता नसून ते समाजाचे किंबहुना देशाचे नेते आहेत. आनंद आणि प्रकाश आंबेडकर यांनी असे जाहीर करावे कि, आमच्या कडे राहण्याची दुसरी व्यवस्था नाहीय, मग बघा संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्यासाठी कसा बाहेर पडतो ते, त्यानां हव्या त्या ठिकाणी हाच समाज एक वेळ कमी खाईल पण राहण्याची व्यवस्था करून देइल. त्यासाठी याबाबत स्वतः खासदार राहिलेले प्रकाश आंबेडकर यानी पुढाकार घ्यायला हवा, त्यांनी ठरवले तर शक्य होवू शकते, परंतू समाजाची वास्तू समाजासाठी सोडण्याच इच्छा शक्ती असावी लागते.
दुसरा प्रश्न राहतो , कोर्टात सुरू असलेल्या केसचा , राजगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर पारशी कुटुंब राहत आहे. यावर आम्हाला असे वाटते कि, जर एखादे सरकार परक्या देशातील राज्य शासनाकडून परवानगी घेत करोडो रुपये खर्च करून एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून डॉ. आंबेडकर फक्त काही कालावधी जेथे राहीले ते विकत घेवून ते ऐतिहासिक म्हणून जाहीर करू शकते. तर आपल्याच देशातील आपल्याच नागरिकाकडून घेवून जेथे डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य जास्तीत जास्त वेळ होते. ते राजगृह ऐतिहासिक वास्तू असे जाहीर करुन जनतेसाठी देवू शकत नाही का? जर राज्य सरकार आणि आंबेडकरी नेत्यांनी ठरवले कि, हे करायचे मग त्यासाठी काहीच कठीण नाही. परक्या देशातील परक्या नागरिकाला समजावून बाहेर काढले जाऊ शकते तर, आपल्या देशातीलच आपलेच पारशी समाजातील भाऊ जे ह्या घरात राहत आहेत त्यांना चांगले पर्याय देवून बाहेर काढले जावू शकत नाही का?
२. पुढचा महत्वाचा मुद्दा, वर्षभरापूर्वी वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया शेजारील सिद्धार्थ विहार हे वसतीगृह तोडण्यात आले. ज्याला सुद्धा ऐतिहासिक वारसा आहे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच नाहितर त्याच्या नंतर घडलेली सर्व आंदोलने येथेच बसून ठरविण्यात आली. दलित पॅंथर ची उभारणी, त्याची सर्व आंदोलने, बैठका येथेच उभी राहिली. हेच नाहीतर रामदास आठवले, नामदेव ढसाळ असे अनेक दिग्गज तसेच संभाजी भगत सारखे शाहीर याच वसतिगृहात तयार झाले. हीच डोकेदुखी विशिष्ट समाजाला होती , त्यामुळेच त्यानीं मोठे कारस्थान करून ते नष्ट केले. उद्या तिकडे एखादी मोठी वास्तू बनेलही, जशी आंबेडकर भवन च्या जागेवर बांधण्यात येणार आहे. पण मग त्या ऐतिहासिक वारश्याचे काय?
कोणत्याही चानेल ने साधी दखल घेतली नाही.
बाकी इतर भाकरीच्या तुकड्याने शांत आहेत, मग प्रकाश आंबेडकर याना त्यावर पत्रकार परिषद किंवा एखादा मोर्चा काढावा असे का वाटले नाही. त्यात त्यांची एखादे कार्यालय नव्हते हे कारण असावे का?
३. आता आपण पुन्हा आंबेडकर भवन बद्दल बोलू, १५ तारखेला ठरलेला मोर्चा अचानक १९ तारखेत बदलला जातो. याबद्दल आयोजन करीत असणाऱ्या एका नेत्याला विचारले असता त्यांच्या एका आयोजक कार्यकर्त्याने असे सांगितले कि, १५ तारखेस आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर ला गेलेला वारकरी समाज येवू शकणार नाही. यावर माझ्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला तो असा, आषाढी एकादशी ला पंढरपूर ला जाणारा हा आंबेडकरी समाज आहे का ? एक वेळ मान्य करू, आहे मग ह्या समाजाला आंबेडकरी भवन आणि त्याची महती माहीत असेल का? खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माहिती असतील का ? नसतील तर मग हा समाज मोर्च्यात कशासाठी येणार?
गणेश मंदिरात नारळ फोडून पूजा घालणारे प्रकाश आंबेडकर जर त्यांचे नेतृत्व करत असतील तर पुढे बोलण्यासाठी काही नाही.(संदर्भ: हा व्हीडीओ सोशल मीडीया वर सगळीकडे पसरला आहे. आता पर्यंत कोणी पाहीला नसेल तर नवलच )
तसेच आंबेडकर भवन एका रात्रीत तोडले गेले नाही , तर याची संपूर्ण पूर्व कल्पना प्रकाश आंबेडकर याना होती. याबाबत प्रकाश आंबेडकर यांचे एक कार्यकर्ते म्हणाले, रत्नाकर गायकवाड हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आंबेडकर भवन च्या जागेवर १७ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव घेवून गेले होते, परंतू प्रकाश आंबेडकर यांनी रत्नाकर गायकवाड याना उडवून लावले. त्यावर या अंध भक्त कार्यकर्त्याने पुढे असे जोडले कि, रत्नाकर गायकवाड यानी त्याचवेळेस पत्रकार परिषद घेतली असती तर हे लोकांना कळले असते, यावर त्या भक्ताला मि विचारले कि, रत्नाकर गायकवाड तर सरकार चा बाहूला होता , परंतू प्रकाश आंबेडकर यांना ते पाडण्यात येणार याची जाणीव होती ना , मग त्यानींच पत्रकार परिषद घेवून का जाहीर केले नाही आणि आंबेडकरी समाजासमोर हे होवू देणार नाही, एकत्र या असे आवाहन का केले नाही, ते आंबेडकर भवन पाडे पर्यंत ते का वाट बघत राहीले? कि, तडजोड होण्याची वाट बघत राहीले? यावर त्या भक्ताने असे उत्तर दिले कि, येथे प्रकाश आंबेडकर यांचे खरच चुकले. पन ते आता आलेत ना मग आपल्याला जायला हवे. यावर हसावे कि रडावे हेच समजेनासे झालेय.
४.शेवटी आणखीन एक महत्वाचा मुद्दा, कधीही जय भिम न घालणारे आणि आयुष्यभर ज्यानी आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करण्यापेक्षा मार्क्सवाद जोपासला , ते समाजवादी अशा वेळेस नेतृत्व घ्यायला पुढे का असतात? या समाजवाद्यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे असणाऱ्या कामगार वर्गाला जरी फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारा सांगितली असती तर आजचे आंबेडकरी चळवळीचे चित्र वेगळे असते.
मित्रांनो हे सगळे अस्तित्वाचे राजकारण आहे. यात आपण भरडले जाऊ नये इतकेच, विचार करा. एका बाजूला आपल्याला इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक आणि लंडन मधील घर दाखवले जात असताना आपल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट केल्या जात आहेत. आंबेडकरी विचारांचा आणि चळवळीचा इतिहास पुसून टाकला जात आहे. मोर्च्याच्या काही दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवन ला भेट दिली, त्यानंतर आंबेडकर भवन च्या कामास स्थगीती देण्यात आली. आता कोर्टात केस जाईल, मग निकाल लागेपर्यंत १० ते १५ वर्षे निघून जातील. यात आता आपण कीतीही म्हटले की समाजाच्या पैशातून उभारू , तरी कोर्टाच्या पुढे कोणीही जाऊ शकणार नाही. इंदूमिल वरील स्मारकाची आणि आंबेडकर भवन ची वाट बघता बघता आपण पूर्ण शिवराय, फुले,शाहू आणि डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि विचार विसरले गेलेलो असू , पुढे आणखी काही वर्षानंतर शिवराय , फुले , शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आपल्या देव्हाऱ्यात पुजत असू.
धन्यवाद....
प्रमोद शिंदे
आंबेडकरी योद्धा
९९६७०१३३३६
२० जुलै २०१६

No comments:

Post a Comment