Friday, September 25, 2015

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय ...


हा एक शोक आहे महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या  एका शेतकऱ्याच्या बायकोचा , तिच्या नवऱ्याने आत्महत्या केल्यावर जेंव्हा मंत्री आणि राजकारणी तिच्या कडे सांत्वनाला येतात . तेंव्हा ती अशा प्रकारे आपला शोक प्रकट करेल ,  ते मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .  

 

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय ...

 

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय  

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

माझ्या बा ची मी लाडकी पोर

लग्नाला आली , जीवाला घोर

लावून दिलं लगीन , शेतकऱ्याच्या पोराशी

मातीचं नातं, जुळवलं मातीशी

तीच माती माझी वैरीण झाली बघा

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

नवरा माझा शेतात राबायचा,

सानच्याला येवून पिरमानं बोलायचा

पोरांना शिकवीन , साळत घालीन

कलेक्टर करीन , असं म्हणायचा

बा मेला , पोरं माझी पोरकी झाली  

खायला काय नाय, आश्रम शाळेत धाडलीत बघा  

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

यंदा पाऊस आला तर , शेत आपलं फळल

तुला लुगडं अन आयला पातळ मिळल

पोरास्नी कपडा अन मला धोतर मिळल

चूल माझी मोडली, शेत माझं सुकलं

दुपार पेरणी साठी , डोरलं भी मोडलं बघा

वाघासारखा माझा धनी , शेळी सारखा मेला बघा

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय  

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

-    प्रमोद शिंदे (९९६७०१३३३६)

२५ -०९ -१५

Thursday, September 24, 2015

असे संत झाले काळी | तोंडी तंबाखूची नळी ||

 
गेल्या 6 महीन्यात महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा दुप्पटीने वाढलाय ,आमच पंत सरकार शांत आहे , ते आपला पैसा कुंभमेळ्याच्या आंघोळी वाहीन्यांवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात खर्च करतय , आम्हा तरूणानी जागे होत ही भोंदूगीरी नाकारली असल्यामुळे कुंभमेळा फेल ठरतोय हे त्याना जाणवलेय .मग या पंत सरकारने अजुन पैसा ह्या कुंभमेळ्याच्या जाहीराती वाहीन्यावर करण्यात टाकला ,तरीही आपली कपटगीरी सफल होत नाही म्हटल्यावर राम कदम सारखे हनूमान 80 हजार लोकाना मोफत कुंभमेळा ...दर्शन करवण्यासाठी उतरवले. पंत सरकार तुम्ही आणि राम कदम तुम्ही हाच पैसा फक्त 800 शेतकर्यानी दुबार पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडी साठी वापरला असता असता तर तुम्हाला नक्की मान मिळाला असता (तुमच्या शब्दात पुण्य मिळाले असते ) .पण तुम्ही जे करताय त्यानी फक्त तुम्ही कपटी असल्याचे दिसून येते.तुम्ही खर्च पण करताय कोणासाठी ?
संत तुकारामांनी म्हंटलेलच आहे...
असे संत झाले काळी | तोंडी तंबाखूची नळी ||
स्नान संध्या बुडविली | पुढे भांग ओढविली ||
भांग भुरका हे साधन | पची पडे मध्येपान ||
तुका म्हणे अवघे सोंग | तेथे कैसा पांडूरंग ||
(अर्थ -अगदी सोपा आहे .)
-प्रमोद शिंदे                                                                                                     
 १४ सप्टे. २०१५

नको दंतकथा सांगो येथे कोणी - संत तुकाराम

 
whats app , Facebook आणि इतर तत्सम सोशल मिडीया वर अनेक लोक असे भेटतात कि, ज्यानी कधीही शाळेचे पुस्तक सोडले तर इतर कसलेही वाचन केलेले नसते , कधीही कोणत्याही प्रकारे तळागाळात उतरुन त्यांच्या साठी संघर्ष केलेला नसतो आणि फक्त ऐकीव माहीतीच्या जोरावर बाष्कळ चर्चा करत असतात. संत तुकारामाना ही त्यांच्या काळात असे काही बाष्कळ तोंड घेवडे भेटले असावेत म्हणून संत तुकारामांच्या मुखी हे अभंग आले असावेत . ...
नको दंतकथा सांगो येथे कोणी |
 कोरडे ते मानी बोल कोण ?
अनूभव येथे पाहीजे साचार |
न चलती चार आम्हा पुढे ||"
ते पुढे असे म्हणतात
तुका म्हणे येथे पाहीजे अनुभव |
  शब्दाचे गौरव कामा नये ||"
- संत तुकाराम
अर्थ :अगदी सोपा आहे .
- प्रमोद शिंदे
२.सप्टे.२०१५

तुका म्हणे आंधळे हे जन |

 
काल 29 ऑगस्ट रोजी दिवसभर सगळ्या वाहीण्या वर कुंभमेळ्याच्या शाही स्नानाचे वर्णन अगदी मार्केटींग च्या जाहीराती प्रमाणे सुरू होते. तेंव्हा मला आज सकाळी संत तुकारामांचा अभंग आठवला.
तुका म्हणे आंधळे हे जन |
गेले विसरोनी खर्या देवा ||
तुका सांगे मूढ जना |
देही देव का पाहाना ||
-संत तुकाराम
अर्थ : (अगदी सोपा आहे .)
प्रमोद शिंदे
२९ ऑगस्ट २०१५

पिंडीवरी विंचू बैसे

 
पिंडीवरी विंचू बैसे,
देवपूजा न चाले त्याला
तिथे पैजार्याचे काम ,
अधमासी तो अधम ||
-संत तूकाराम
...
अर्थ : आम्ही ज्याना आदर्श मानतो, ज्याना पुजतो अशाना जर का स्वार्थी आणि विकृत व्यक्तिनी(विंचू) पूजा आणि कर्मकांडाखाली घेरले असेल आणि त्यामुळे आमच्या देवाला त्याच्या व्यक्तीमत्वाला त्रास होत असेल तर तिकडे विनवणी (देवपूजा ) करून भागणार नाही .तिकडे पायातील चप्पल (पैजार्याचे) काढावी लागते . तिकडे अधर्म झाला तरी हरकत नाही ...
- संत तूकाराम
संकलन : प्रमोद शिंदे
२५ ऑगस्ट २०१५

सोशल मिडीया वर निखिल वागळे चर्चेचा विषय

मित्रान्नो ...
सध्या काही दिवसान पासून सोशल मिडीया वर निखिल वागळे चर्चेचा विषय बनलेत ..त्याना आलेल्या अनिरुद्ध जोशी आणि विकास देशपांडे यांच्या फोनची चर्चा आहे ...
त्याना आलेल्या फोनवर त्यान्नी आपली शब्दाची पातळी न सोडता केलेला प्रतीवाद विश्वसनीय आहे .
समोरच्या दोघानीही सतत त्याना उकसवून पाहण्याचा प्रयत्न केला ,परंतू त्यान्नी पातळी न सोडता त्याना ठोकून काढले .
त्याना येणार्या फोन मुळे काही तरुण चिंतित झाले. ...
त्यांचाही बळी पडू नये यासाठी यासाठी पुढे आले .
परंतू सध्या भारत मुक्ती मोर्चाचे काही कार्यकर्ते निखील वागळे कसा वाईट आहे ...शेवटी तो ब्राम्हण आहे ...त्याच्यावर विश्वास ठेवू नका ...
त्यासाठी ते आंबेडकरांच्या भाषणाचे दाखले देत आहेत ...आणि ज्या पुस्तकांचा संदर्भ देत आहेत ती सर्व पुस्तके त्यान्नीच प्रकाशीत केलेली (मुलनिवासी प्रकाशन ) ची आहेत .
कधी कधी वाटते की ...समाजात दोन गट निर्माण करण्यासाठी RSS नेच त्याना उभे नाही ना केले?
तोडो फोडो और सत्ता हासील करो .
ते सांगतात की वागळे वर विश्वास ठेवू नका ...मग कोणावर विश्वास ठेवावा ...
तुमच्यावर ?
तुम्ही तरी मागील तिन दशकात असे काय केलेय? की तुमच्या वर विश्वास ठेवावा ...
तुमच्या सोबत 30 ते 35 वर्ष प्रामाणीक पणे कार्य केलेले ...तुमच्या बद्दल काय बोलतात ...जरा त्यांच्या घरी जावून ऐका.
मग तुम्हाला कळेल मि असे का बोलतोय?
पुस्तकाचाच संदर्भ द्यायचा असेल तर तुमच्यासोबत दोन दशके काम केलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने लिहलेले "वामन बना बामन" हेही पुस्तक वाचावे ..किम्मत 200 /-रुपये चैत्यभूमी दादर येथे उपलब्ध आहे .
मान्य की ब्राम्हणानी जाती निर्माण करून ..स्वताच्या आर्थीक आणि सामाजीक प्रगती साठी त्या तेवत ठेवल्या.
इतिहास बदलला ..खोटा इतिहास सांगितला ..
एखादा व्यक्ती जरी तो तुमचा शत्रू असेल आणि तो तुमच्या विचारांच्या छत्रछाये खाली येवू इछीतो ..तर त्याला तुम्ही झीडकारणार का?
का तर तो , ब्राम्हण आहे म्हणून ? ...असे असेल तर तुम्ही आजचे ब्राम्हण आहात ...जातीयवादी
हे कार्यकते असेही म्हणतात की ,वागळे यान्ना सहकार्य करू नका ..दुर्लक्ष करा ...
त्याना मि विचारू इछीतो की मग त्यांचा पण दाभोळकर आणि पानसरे होवून देवू ...तो पर्यंत वाट बघावी का?
इतके आम्ही षंड आहोत का ?
आपल्या महापुरूषांच्या शरणात आलेल्याला वार्यावर सोडू ..शत्रूच्या समोर भक्ष होवून देवू ..
नाही आम्हाला हे नाही जमणार ..
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत ...
फूले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रचारक आहोत ..
--प्रमोद शिंदे
९ जून २०१५

दादा इदाते यांचा एक चाहता

 
RSS -संघ - भाजपने आपला ब्राम्हणी वर्चस्वाचा जातीयवादी मेंदू अखेर दाखविला .
दादा इदाते यांचा वापर करून भाकरीचा तुकडा टाकून कस्पटाप्रमाणे बाजूला सारले ...
आपली विकृत मनोवृत्ती अखेर दाखवीलिच ...
काम काम झाले की, वापर करून बाजूला फेकून देण्याची कृती दाखवीली.
दादा इदाते याना जातीय अस्तित्वता दाखविली .
ज्या दादा (भिकु) इदाते यान्नी महाराष्ट्र भरात खेडो पाड्यात भटके विमुक्तान्ना एकत्र करून संघाशी जोडले ...
समरसता मंच च्या शाखा खेड्या खेड्यात सुरु केल्या .
समता परीषदेच्या नावाखाली आतापर्यंतचा rss चा कट्टर विरोधक असणारा बुद्धिस्ट संघाशी जोडला ...
कोकणातील कुणबी समाज संघाशी जोडण्यासाठी ज्यानी सावित्रीबाई फुले शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
त्या अंतर्गत राज्यभरात वसती गृह आणि शाळा ,महाविद्यालये उभी केली.
पारधी समाजासाठी यमगर वाडी हा प्रकल्प उभा केला.
संघबंदी च्या काळात आणि आणीबाणी च्या काळात ज्यानी संघासाठी तुरुंगवास भोगला .
तळागाळातून भाई गिरकर ,एकनाथ खडसे ,आणि अगदी गोपीनाथ मुंडे असे बहूजन नेते दिले.
महाराष्ट्रातील तळातला अब्राम्हण कार्यकर्ता अक्षरशा ज्याना पुजतो .
अशा उच्च शिक्षीत दादा इदाते याना खरेतर संघाने सरसंघचालक करायला हवे होते ...
परंतू संघाने त्याना कायम हनूमान म्हणूनच वापरले .
सत्ता आल्यावर वाटले आता तरी त्यांच्या कार्याचा गौरव होइल ...
त्याना त्यांच्या कष्ठाचे फलीत मिळेल .
1जानेवारी 2015 रोजी त्याना राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष केले ..वाटले दादा आता मंत्री झाले ...आता लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार ...
पण काही दिवसांपुर्वी त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली .त्यातून काही गोष्टी अशा समजल्या आणी राग आला आणि आज लोकसत्ता मधील बातमी वाचून राहवले नाही.
येवढा राज्यमंत्रीपदाचा दर्जा असताना त्याना मुख्यमंत्र्याची भेट मिळत नाही ..
एका कार्यक्रमात दोघे एकत्र असताना मुख्यमंत्री त्याना भेटत नाहित .
आणि आता त्यांचा असा अपमान ...केंद्रिय आयोगाचे अध्यक्ष करून सचिवाचा दर्जा ...
वाह रे ब्राम्हणी प्रवृत्ती ...वाह ..
कधी समजणार इतर बांधवाना ?
दादा तुम्ही हीच मेहनत शिवराय ,फुले , शाहू आणि आंबेडकरी विचारधारे साठी केली असती तर आम्ही आपल्याला डोक्यावर घेवून नाचलो असतो ...
काहीही असो दादा आम्ही आपल्या समर्पणाचा आदर करतो ...
जय जिजाऊ ...जय शिवराय आणि जय भीम
-प्रमोद शिंदे
४ जून २०१५
(दादा इदाते यांचा एक चाहता )
संदर्भ ...
भटक्या- विमुक्त आयोगाची केंद्राकडून गळचेपी
लोकसत्ता ...Jun 03, 2015

बाबा आज तुम्ही असायला हवात

बाबासाहेब आज तुम्ही असायला हवात
बाबासाहेब आज तुम्ही असायला हवात ,
हे पहायला कि, तुमच्या लेकरांनी तुमचा धंदा केलाय
तुमच्या कार्याचा विचारांचा चेंदामेंदा केलाय 

तुमचे पुतळे नाक्यानाक्यावर उभे राहिलेत
तसबीरी लक्ष्मी गणपतीच्या बाजूला टांगू राहिलेत
गणपती पूजताना तुमचं लेकरू तुमालाबी ओवाळतय
निळा टीळा लावून जयभीम म्हणत दर शनिवारी हनुमानावर तेल ओततय
जयंतीला "माझा भीम मोटारीत बसलाय” म्हणत 
तुमालाचं डोक्यावर घेऊन नाचतय,

बाबासाहेब, खरच तुम्ही आज असायला हवात
हे पहायला कि, तुमच्या लेकरांनी तुमचा धंदा केलाय
तुमच्या कार्याचा विचारांचा चेंदामेंदा केलाय

तुम्हाला अभिप्रेत असलेला बुध्द अजून आम्हाला नाही भेटला 
तुमच्यानंतर प्रत्येकाने बाबासाहेब होऊन आपापला बुध्द फेकला 
तुमचा भक्त बुद्धपूजा घालत विहाराला बुध्द मंदिर म्हणतोय
बंद डोळ्यांच्या दगडमातीच्या बुध्दाला हात जोडून नवस मागतोय
तुमचा प्रगतीचा रथ मागे ढकलतोय
बाबासाहेब खरच तुम्ही आज असायला हवात
हे पहायला कि, तुमच्या लेकरांनी तुमचा धंदा केलाय
तुमच्या कार्याचा विचारांचा चेंदामेंदा केलाय

तुमचं लेकरू दादागिरी करत सरकारी ऑफिसच्या दारात तुमच्या तसबिरी लागतंय
अन त्या समोर पाट मांडून सत्यनारायण मांडतय
6 डिसेंबर ला खंडणी गोळा करून चैत्यभूमीवर दिवसरात्र चहाबिस्कीट जेवण वाटतंय
दुसऱ्या दिवशी बेकारीच्या ढुंगणावर “कमवायची अक्कल नाय” ऐकत बापाच्या लाथा खातय
रात्री तीच बेकारी घश्याखाली ओतून बापालाच “आई झवाड्या” शिवी घालतंय.

बाबासाहेब खरच तुम्ही आज असायला हवात
हे पहायला कि, तुमच्या लेकरांनी तुमचा धंदा केलाय
तुमच्या कार्याचा आणि विचारांचा चेंदामेंदा केलाय 

तुमच्या लेकरांनी बाजारात कापलाय तुम्हाला
वाटया वाट्याने पक्षाच्या दारावर विकलाय तुम्हाला
मोबदला म्हणून कोण महामंडळ घेतय, 
तर कोण बुडाखाली लाल दिवा घेतंय           
वामन तुमच्या लेकीकडे चावट नजरेनं बघतोय 
अन तुमचं लेकरू त्याच्याच मांडीवर जाऊन बसतय
पुन्हा गळ्यात मडकं कमरेला झाडू बांधण्याची तयारी करतंय 

बाबासाहेब खरच तुम्ही आज असायला हवात
हे पहायला कि, तुमच्या लेकरांनी तुमचा धंदा केलाय
तुमच्या कार्याचा विचारांचा चेंदामेंदा केलाय


प्रमोद शिंदे

जत्रा मे फत्रा बिठाया |

 
सध्या जे तरुणामध्ये वेगळेच क्रेझ निर्माण झालय ....तिरुपतीला जाणे ,शिर्डीला पायी जाणे ,रात्रभर सिद्धिविनायकला आणि लालबागला जाणे याशिवाय अष्टविनायक , जगन्नाथ यात्रा आणि इतर धार्मीक स्थळे ...
हे ऐकले की संतानी केलेल्या कार्याची आठवण होते, संत गाडगे महाराज म्हणत "बापहो देवळात कायले जाता , देवळात देव राहीत नाही ,देवळात पुजार्याचे पोट राहते ."तुम्हाला जर देव भेटावा असे वाटत असेल तर तो तुम्हाला गरीबान मधे शोधा , त्यांच्या अंतरामध्ये शोधा ,पोराबाळांच्या शिक्षणामध्ये शोधा ". ... तर संत कबीर म्हणत ,
"जत्रा मे फत्रा बिठाया |
तीरथ बनाया पानी |
दुनीया भई दिवानी |
पैसो की धूलधानी || अशा या संताचे खरे कार्य झाकण्यासाठी अशा या नामदेव , ज्ञानेश्वर,आणि तुकाराम यांचे कार्यकर्तृत्व नाकारून या संताच्या नावावर जे दैवी चमत्कार जोडले गेले , जसे ज्ञानेश्वरानी भिंत चालीवली , पाठीवर मांडे भाजले,रेड्याच्या तोंडी वेद वदविले ...आणि तुकारामाच्या गाथा इंद्रायणीतून बाहेर आल्या , मुघल शिवरायाना संत तुकारामांच्या कीर्तनात पकडायला आले तर त्याना सगळीकडे शिवराय दिसत होते ...संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले , संत गोरा चे मुल परत जीवंत झाले'आणि "आपले बुद्धी शुन्य गेले चमत्कार बघून नमस्कार करायला". हे सर्व संत तुकडोजी महाराज याना सहन झाले नाही ,अशा वेळेस संत तुकडोजी महाराज ग्राम गीतेत म्हणतात ...
करावया चमत्कार | संत नोव्हेत जादूगार ||
संताचे खरे कार्य हे या भोळ्या भाबड्या समाजाला कर्मकांड आणि जाती द्वेषातून बाहेर काढणे हे होते. संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज नामदेव -तुकारामांचा वारसा चालवीत होते . याबद्दल संत तुकडोजी महाराज आपल्या ग्राम गीतेत म्हणतात .
"वाईट भावना नासावया |
लोकी कर्त्यव्यशीलता यावया |
समाज सुस्थितीत नांदावया |
भजने केली संतानी ||

प्रमोद शिंदे
४ सप्टे. २०१५
 
 

जेष्ट पुरोगामी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या

 
अगोदर महाराष्‍ट्रातील पुरोमागी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्‍या ज्‍या पद्धतीने करण्‍यात आली. त्‍याच पद्धतीने आता जेष्ट पुरोगामी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या,  कलबुर्गी हे प्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक होते त्‍यांना साहित्‍य अकादमीसह अनेक मानाचे पुरस्‍कार प्राप्‍त आहेत. भारतातील जवळपासच सर्वच भाषांमधून त्‍यांचे साहित्‍य अनुवादित झालेले आहेत. हिंदूत्‍ववादी विचार आणि संघटना यांच्‍या विरोधात ते विचार मा...ंडत असत. त्‍यामुळे विद्रोही लेखक म्‍हणूनही ते प्रसिद्ध आहेत. अशा क्रांतीकारी शहीदाला अभिवादन!! त्यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करताना मला मला येथे संत ज्ञानेश्वराची आठवण होते ते आपल्या अभंगातून म्हणत ..
देव ते काल्पित |
शास्त्र ते शाब्दिक |
पुराणे सकळीक |
बाष्कळीक || - संत ज्ञानेश्वर अर्थ : अगोदर आस्तिक आणि शास्त्राचे भक्त असणारे संत ज्ञानेश्वर हे संत नामदेवाच्या सहवासात आल्यानंतर देवाला कल्पित ,शास्त्राला शाब्दिक आणि पुराणाला बाष्कळ बडबड म्हणतात .तेंव्हा ब्रम्हवृंदाचे धाबे दणाणले . ब्राम्हण कुळातून एक विद्रोही तयार होतोय याची धास्ती निर्माण झाली . कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरतो म्हणून तत्कालीन संत ज्ञानेश्वरास जीवंत पुरले असावे ,आणि प्रचार केला असावा जीवंत समाधी घेतली .
असे म्हणने भक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारे आहे पण नाईलाज आहे सत्य सांगावे लागते . (संदर्भ: "नामदेवे रचीला पाया" लेखक : गंगाधर गीते , पान न.41 )
कारण संत तुकाराम म्हणतात .
सत्य असत्यासी | मन केले ग्वाही | मानियले नाही | बहूमता ||
अशा या सत्य सांगण्या साठी शहीद होणार्या कलबुर्गी यान्ना विनम्र अभिवादन                            
-प्रमोद शिंदे
१ सप्टे. २०१५

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर |

 
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर |
वर्म सर्वेश्वर, पुजनाचे ||
आणि
भले तरी देवू कासेची लंगोटी |...
नाठाळाचे माथी हाणू काठी ||
- संत तुकाराम
काल 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मला आलेल्या धमकीला उत्तर देण्यासाठी आज मुद्दामहून मी संत तुकारामांचे हे दोन अभंग देत आहे .
अर्थ : कोणत्याही जीवमात्राचे वाइट व्हावे असा आम्ही कधीही विचार करत नाही ,सगळे जन आम्हाला पुजनीय आहेत.
आणि एखादा विकृत बुद्धीचा आमच्या अंगावर आला तर आमचे सर्वस्व गेले तरी चालेल परंतू त्या नालायकाचे (नाठळ) मस्तक फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही .
-प्रमोद शिंदे
२८ ऑगस्ट २०१५

भजन चाले उफराटे

 
भजन चाले उफराटे ,
कोण जाणे खरे खोटे ||
सजीवासी लाथा ,
निर्जीवापायी ठेवी माथा ||...
तोंडा धरुनी मेंढा मारा ,
म्हणती सोमयाग करा ||
नामा म्हणे अवघे खोटे ,
एक हरीनाम गोमटे ||
- संत नामदेव
अर्थ : सगळीकडे भजन , किर्तने सुरू आहेत . पण ती खरी आहेत की खोटी हे कोणालाही माहीत नाही . सजीव जे वंचीत आहेत ज्याला खरी गरज गरज आहे त्यांच्या साठी कोणिही पुढाकार घेत नाहीत . पण मंदिरातील दगडाच्या मुर्तीचे सगळे लाड पुरवले जातात .मांस मटण खावुन दारू(सोम) पिवून (गटारीला)शरीराचे सर्व चोचले पुरविले जातात .नामदेव महाराज म्हणतात फक्त देवाचे नावच सुंदर आहे बाकी त्याच्या नावावर चालू असलेले हे सर्व खोटे आहे
-प्रमोद शिंदे
२७ ऑगस्ट २०१५

प्रजासत्ता की धर्मसत्ता

प्रजासत्ता की धर्मसत्ता
२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला . ज्याला आपण गणतंत्र दिवस असेही बोलतो . प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेचे सत्ता , या भारतात राहणाऱ्यांची सत्ता होय . २६ जानेवारी १९५० पूर्वी भारतात इंग्रजांची सत्ता होती . १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे आपण म्हणतो तरी २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे नाव “ब्रिटीश डोमिनियन इंडिया “ म्हणजेच “इंग्रज आधिपत्याखालील भारत” असेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे राष्ट्रगीत “ God save the King” हेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करताना निर्माण केलेला सामंजस्य करार ज्याला “ भारतीय स्वातंत्र्यता कायदा १९४७” हाच लागू होता . २६ जानेवारी १९५० पासून भारतात भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक कारभार सुरु झाला. भारताचे नाव भारत असे घोषित झाले . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांची सत्ता होती असे जरी आपण म्हटल, तरी भारतीय जनमानसावर आणखीन एक सत्ता हुकुम गाजवत होती ती म्हणजे धर्मसत्ता, धर्माच्या नियमांची सत्ता , स्वतःला धर्म प्रमुख म्हणवनाऱ्यांची सत्ता होती, अशी नियमावली जिला बहुसंख्येने असलेले हिंदू “मनुस्मृती” म्हणत तर अल्पसंख्य मुस्लीम “हदीस” म्हणत. हि सत्ता हजारो वर्षापासून सुरु होती यात वर्णा नुसार , जातीनुसार लोकांनी कार्य करावे . प्रत्येक वर्णाच्या लोकांनी त्यांचे त्यांचे नेमून दिलेले म्हणजेच उच्च वर्णीयांच्या सेवेचे काम करावे , “मनुस्मृतीनुसार” ब्राम्हण हा सगळ्यात उच्च स्थानी याने शिक्षण घ्यावे , पूजा कराव्यात, याला कोणीही शिक्षा करू शकत नाही याच्याकडे वर मान करून कोणीही बघू नये अगदी राजा किंवा यांच्या आईने, बायाकोनेही नाही. या नंतर खालोखाल क्षत्रिय याने राज्य कारभार सांभाळावा, ब्राम्हणांच्या नियमानुसार राज्य चालवावे ब्राम्हण सोडून इतरांना शिक्षा द्याव्यात . त्या खालोखाल येतो वैश्य म्हणजेच व्यापारी समाज याने व्यापार करावा , आणि पैसा जमा करावा आणि तो धार्मिक कार्यासाठी ब्राम्हणांना द्यावा. आणि सगळ्यात शेवटी अगदी तळाला येतो शुद्र आणि अति शुद्र यांनी या वरील तिन्ही समाजाची सेवा करावी , याच्याकडे पाणी भरावे ,यांची घाण उचलावी यांच्यासाठी शेती करून यांची पोटे भरावीत , ब्राम्हण म्हणतील त्या पूजा घालाव्यात, ब्राम्हण जेवण भरवावीत, अगदी जन्माला येण्या आधी गर्भसंस्कार , त्यानंतर नामकरण , तो तरुण झाल्यावर सुरक्षा पूजा , नंतर लग्न आणि मृत्यू आणि मृत्युनंतर हि दरवर्षी श्राद्ध पूजा प्रत्येक वेळेस ब्राम्हणाची गरज , म्हणजेच ब्राम्हणांच्या पोटापाण्याची सोय , असा हा अगदी “मनुस्मृती”चा लिखित कायदा होता , म्हणजेच धर्माची सत्ता होती. अगदी २६ जानेवारी १९५० पर्यंत ती संपूर्ण भारतभर लागू होती. २६ जानेवारी १९५० नंतर भारतात प्रत्येक भारतीय स्त्री आणि पुरुषाला स्वतःचे मत मांडण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला . त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. प्रत्येकाला बरोबरीची संधी प्राप्त झाली, त्यांना देशाचे नियम बनविण्याचा अधिकार प्राप्त झाला , , त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली, त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचा प्रतिनिधी संसदेत पाठविण्याचा अधिकार मिळाला. संसदेत जावून स्वतःचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळाला , त्यांना समान न्याय मिळवण्याचा अधिकार मिळाला . संविधानानुसार स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय , विज्ञान आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला . “मनुस्मृती” चे म्हणजेच धर्माचे नियम झुगारून तो शिक्षण घेवू लागला , ब्राम्हणाच्या बरोबरीने पंगतीला बसू लागला. तो डॉक्टर झाला , इंजिनियर झाला , आय . ए . एस झाला, आय . पी. एस . झाला , तो वकील आणि न्यायाधीश झाला . तो खासदार आणि आमदार झाला . हे सर्व साध्य झाल फक्त संविधानामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या अथक प्रयत्नानामुळे शक्य झाले .
ह्याच काही गोष्ठी धर्म प्रमुखांना खुपू लागल्या , धर्माचे प्राबल्य आणि अधिकार संपले असले तरी धर्म संपले नव्हते . त्यांचे नियम लागू होत नव्हते तरी त्यांचे प्रमुख पद ब्राम्हणांकडे असावे, असे सर्व सम्मत झाले होते . याचाच फायदा ह्या धर्माच्या ठेकेदारांनी घेतला आणि आम्हीच संस्कृतीचे रक्षक आहोत, आणि इतर धर्मापासून आपल्या धर्माला, संस्कृतीला धोका आहे, धर्म संकटात आहे असे सांगत धर्माचा कारभार जास्त जोमाने सुरु केला , धार्मिक सणांचे महत्व वाढविले . नवीन नवीन धार्मिक प्रथा आणि धार्मिक पूजा सुरु केल्या. शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे ना मग शिक्षणातच धर्म घातला , गायत्री पठन , सरस्वती पूजा , गीता पठणाच्या स्पर्धा , दहीकाला उत्सव, आणि दिवाळी आणि गणपतीच्या सुट्ट्या सुरु केल्या , यामागे भारतीय कशाप्रकारे आयुष्यभर धार्मिक कार्यात व्यस्त राहील असे कारस्थान होते आणि ते त्यांनी साध्य केले . अगदी लोकांना संविधान आणि त्यातील मूल्य, कर्तव्ये आणि अधिकार कळू दिले नाहीत , या दिवसाचे महत्व कळू नये याची पुरेपूर सोय केली, आणि अगदी गेल्या दहा वर्षा पासून तर यांनी तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजा सुरु केल्या. सर्व जनांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि बहुसंख्य प्रजेचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशा छत्रपती शिवराय , ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेगळीच प्रतिमा निर्माण केली. शिवरायांना धर्म रक्षक तर ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म विरोधी जाहीर केलं. यांच्या आनुयायात वाद निर्माण केले , आणि यांच्या जयंतीच्या दिवशी सत्यनारायण घालावे असे नवीन नियम तयार केले . अगदी सूत्रबद्ध पद्धतीने काम सुरु केले ह्यातून आज हि प्रजेची सत्ता नसून धर्माची सत्ता आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. काहींचे म्हणणे यावर असे आहे कि या दिवशी सुट्टी असते सगळेव घरी असतात . म्हणून आम्ही पूजा घालतो, त्यांचे हेच म्हणणे हास्यास्पद वाटते . जगाच्या पाठीवर भारत हाच असा एकमेव देश आहे कि ज्यात वर्षाच्या ३६५ दिवसापैकी 22 सुट्ट्या ह्या आहेत ज्या शनिवार आणि रविवार सोडून येतात म्हणजेच एकूण ९६ आणि २२ अशा ११८ सुट्या आहेत मग ह्याच 4 दिवसांत सत्यनारायण घालण्याचे प्रयोजन काय? गेल्या ३ वर्षापासुन तर २६ जाने वारी च्या आदल्या रात्री म्हणजेच २५ जानेवारी च्या रात्री मोठ्याप्रमाणात भंडारा जेवण आणि धार्मिक मिरवणूक आयोजित करायची कि या प्रजेने सकाळी ध्वज वंदनेसाठी उठू नये, देशाभिमानासाठी तो उठला आणि त्याने ध्वज वंदन साजरे केले तरी त्याचे संपूर्ण लक्ष्य संध्याकाळी होणाऱ्या सत्यनारायण पूजे कडे असते ,कारण ती त्याच्यासाठी महत्वाची असते. शिवजयंती आणि आंबेडकर जयंती दिनी सत्यनारायण घालून शिवराय आणि आंबेडकर कळू न देणे . मित्रांनो अश्या प्रकारे प्रजेची सत्ता संपवून पुन्हा एकदा भारताला हिंदुस्थान घोषित करून धर्माची सत्ता लागु करण्याचा हा डाव आहे आणि आपल्या न करते पणामुळे, यांच्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे तो यशस्वी होताना दिसत आहे . माझी आपण सर्वांना हीच विनंती आहे कि आपण आपला धर्म स्वतः ठेवावा , तो साजरा करावा पण १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी , २६ जानेवारी या प्रजा सत्ताक दिनी , आणि देश हित साठी आणि समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवण्याच्या दिवशी कोणतीही पूजा घालू नये , कारण या सर्वांनी कधीही धर्मासाठी लढाया केल्या नाहीत, यांनी स्वतः आपला धर्म घरात ठेवून देश हितासाठी , समाज परिवर्तनाचे कार्य केले . या दिवशी धार्मिक पूजा घालणे म्हणजेच देशाचा आणि या महापुरुषांचा अपमान होईल. शेवटी आपल्यालाच ठरवावे लागेल कि आपल्याला आपल्या देशात काय हवय? प्रजासत्ता कि धर्मसत्ता?
-प्रमोद शिंदे
 २२ जून २०१५ 

क्रांतीची लढाई कधीही थांबणार नाही .....

क्रांतीची लढाई कधीही थांबणार नाही .....
काही वर्षापूर्वी रंग दे बसंती नावाचा एक चित्रपट आलेला होता, चित्रपटाच्या शेवटी एक अतिशय सुंदर गाणे आहे, “रूबरू” या गाण्याच्या सुरवातीला एक शेतातले दृश्य आहे. “ एक व्यक्ती शेतात रोपटं लावतोय आणि एक लहान मुल जवळ येवून त्याला विचारतय “पापाजी तुम ये क्या कर रहे हो? यावर तो व्यक्ती म्हणतो “ आम बो रहा हु पुतर,” यावर लहान मुल म्हणते “क्यो?”, तर ती व्यक्ती म्हणते, “एक आम बोवोगे तो लाखो पाओगे”. ह्या दृश्याचा अर्थ जरी अगदी साधा निघत आला असला तरी ह्या दृश्यावरून मला आजच्या परिस्थितीवर भाष्य करावेसे वाटते. ते असे कि, नुकतीच कोल्हापुरात झालेली साहित्यिक आणि विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या , माणुसकीला आणि विचार स्वातंत्र्यचा गळा घोटणारी कृती, अगदी दीड वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे साहित्यिक आणि विचारवंत नरेंद्र दाभोळकरांची अशीच हत्या घडवून आणण्यात आली. या दोघांचे कार्य आणि विचार आणि त्यांचे झालेले खून हे अगदी एकाच पद्धतीचे असल्याने, हे कोणी करून आणले असतील यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. त्यांचे कार्य आणि विचार कोणाला नको होते ? ते कोणाला घातक वाटत होते? त्यामुळे कोणाचे नुकसान होणार होते? हे आपण सर्वच जन जाणतो. यावर अशा विचारस्वातंत्र्य नष्ट करू पाहणाऱ्या नतद्रष्टांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतावर अनेक आक्रमणे झाली, हल्ले झाले पण आतापर्यंत कुणीही विचारांचा खुन करू शकलेला नाही. तुम्ही चार्वाक जाळून मारलात, ते गुन्हा तुम्ही स्वीकारत नाही, चार्वाकाच्या विचाराने प्रेरित होऊन गौतम बुद्ध जन्माला आला , भारताने जगाला गौतम बुद्ध दिला, तुम्ही गौतम बुद्ध मारलात, पण ती हत्याही तुम्ही स्वीकारली नाहीत पण याच गौतम बुद्धाला तुम्ही तुमच्या कपोलकल्पित अवताराच्या यादीत नेऊन बसवलात कारण गौतम बुद्ध मेल्यानंतरही तुम्हाला त्यांची भीती वाटते, कारण प्रत्येक सामान्य माणसात बुद्ध जिवंत राहिला , गौतम बुद्धांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, संत कबीर आणि संत गाडगे महाराज या अशा संतानी सुरु ठेवला, या संतानी भारतभर नवीन बुद्ध निर्माण केले, तुम्ही संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, आणि संत कबीर यांचे खून केलेत. ते हि तुम्ही लपविलेत उलट याच संताच्या जीवनात चमत्कार घुसवून तुम्ही त्यांचे दैवीकरण करण्याचा खुळचट प्रयत्न केलात, पण या संतांच्या क्रांतिकारी विचाराने आणि प्रबोधनाने भारतात गुरुनानक , छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे या सारखे मेंदू आणि मनगट बळकट असलेले नेतृत्व तयार झाले, गुरुनानाकांच्या आणि शिवरायांच्या वाणीने आणि संभाजी राजांनी लिहिलेल्या “ बुद्धभूषण” ह्या बुद्धांचा विचाराने भारतभर स्वाभिमानी मावळे निर्माण झाले . तर तुम्ही गुरुनानकाना देव बनविलेत आणि तुम्ही शिवरायांचाव व संभाजी राजांचा खून केलात आणि हे काळे कृत्यही लपवून ठेवलेत, तुम्हाला यांचीही भीती वाटली म्हणून खरे शिवराय आणि संभाजी राजे तुम्ही लपवून ठेवलेत आणि शिवरायांना धर्मरक्षक तर संभाजी राजांना बदनाम केलेत, आणि जेंव्हा तुम्हाला कळले कि हे लपविणे आता कठीण आहे तेंव्हा तुम्ही या छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर तुमचे निष्क्रिय गुरु बसवलेत. तरीही तुम्ही त्यांचे विचार आणि कार्य संपवू शकला नाहीत कारण सत्य कधीही अधिक काळ लपून राहत नाही, ते बाहेत येते आणि ते बाहेर आले , त्यांचा खरा वारसा ज्योतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे यांनी सुरु ठेवला. त्यांनी संपूर्ण भारत जागा केला एक नवीन भारत निर्माण केला, भारताला संविधान दिले, शोषित आणि वंचीताना शिक्षणाचा अधिकार दिला , शिवरायांच्या मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमान जागा केला, गल्लो गल्ली काना कोपऱ्यात “बुद्ध” निर्माण केले. तुम्ही त्यांच्यावरही मारेकरी धाडलेत, त्यांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मारलेत, तुमचं हे काळ कृत्य दरवेळे प्रमाणे स्वीकारले नाहीत, उलट तुम्ही त्यांना आजही घाबरता म्हणून तर तुम्ही त्यांना जातीत बांधून ठेवलेत. कला , संस्कृती आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून त्यांना फक्त त्यांच्या जातीपुरतेच मर्यादित ठेवलेत. तरीहि या महापुरुषांचे प्रगतीकडे घेऊन जाणारे , जाती जातीतील दरी संपविणारे , देशाला एकसंघ ठेवणारे पुरोगामी आणि विज्ञानवादी विचार संपले नाहीत. उलट आज नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि त्यांच्यासारखेच अनेक विचारवंत आणि प्रबोधनकार तयार झालेत. आज तुम्ही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या केलीत. यावर मला तुम्हाला हेच सांगायचे आहे कि, तुम्ही त्यांच्या शरीरावर गोळीबार केलात, पण त्यांच्या विचारांवर गोळीबार करणारी बंदूक अजून निर्माण झालेली नाही, आणि भविष्यात तयार होऊ शकत त्यामुळे तुम्ही हा विचार सोडून द्या कि व्यक्ती मारल्याने त्याचे कार्य आणि विचारही मरतील तर हा तुमचा विचार मूर्खपणाचा आहे . नरेंद्र दाभोलकर , गोविंद पानसरे यांच्यासाखेच चार्वाक आणि बुद्धांचा वारसा पुढे नेणा ऱ्या आधुनिक संतानी आमच्या सारखेच लाखो “ बुद्ध” येथे तयार केलेत, आमच्या सारखे लाखो दाभोळकर आणि पानसरे काना कोपऱ्यात उभे केलेत, त्यात कोणाकोणाला मारणार तुम्ही? हि क्रांतीची, प्रगतीची लढाई न कधी थांबली होती न कधीही थांबणार नाही. उलट आम्ही आता अगदी जोमाने विचारांच्या तलवारी पाजळल्यात, त्यांना प्रगतीची धार दिलीय, क्रांतीच्या कार्याला जोमाने सुरवात केलीय.
प्रमोद शिंदे
 ११ जून २०१५

गोलमाल है भाई ...सब गोलमाल है ..

 
गोलमाल है भाई ...सब गोलमाल है ..
एन्रॉनच्या रिबेका मार्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यानंतर शिवसेनेचा एन्रॉन वीज प्रकल्पाला असलेला विरोध तेव्हा मावळला होता. आता जैतापूरबाबत शिवसेनेने मवाळ भूमिका घेतली आहे. नेमके तेव्हाच लंडनमध्ये असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोण भेटले का ?
उद्धव लंडनमध्ये असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेची जैतापूरबाबत भूमिका मवाळ झाल्याचे संकेत दिले होते. शिवसेनेचा विरोध असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश द...ौऱ्यात जैतापूर प्रकल्पाबाबत करारही केला होता. शिवसेनेची भूमिका बदलण्यामागे लंडनमध्ये असलेल्या ठाकरे यांची कोणी भेट घेतली होती का?
प्रमोद शिंदे
५ जून २०१५

दया तिचे नाव ,भुतांचे पालन |

                                                                                       
दया तिचे नाव ,भुतांचे पालन |
आनिक निर्दालन , कंटकांचे ||
काल मि संत तुकारामांचा हा अभंग माझ्या मुलाला शिकवायचे ठरवले, त्याला शिकविला , त्याने पाठ ही केला .त्याचा प्रतीप्रश्न येण्याअगोदर मि यातील शब्दांच्या अर्थासाठी संशोधन करू लागलो . संत तुकाराम "भुते पाळा" म्हणजे "दया" असे कसे म्हणू शकतात ,त्यामुळे मि भुत या शब्दाचा त्या काळातील अर्थ शोधू लागलो ,परंतू सगळी कडे पिशाच्च, हाडळ ,आणि आत्मा असेच अर्थ मिळत होते ,परंतू एके ठिकाणी गिरिश घलसासी यांच्या रामदास आणि शिवराय या प्रवचनात ते असे सांगत होते कि ,भुत म्हणजे मागे राहीलेले शोषीत मग मि शोषीत या शब्दाचा अर्थ शोधू लागलो तर तो असा मिळाला ,पिढ्यान पिढ्या ज्यांचे शोषण होत आहेत ते पिडीत, तळागाळातील जातीच्या उतरंडीतील खालाच्या जातीतले म्हणजे "शोषीत" असा अर्थ मिळाला . म्हणजेच तळागाळातील शोषीत आणि पिडीत यांचे पालनकर्ते बना ,त्यांचा सांभाळ करा . पुढे संत तुकाराम म्हणतात आनिक निर्दालन कंटकांचे ,"कंटक" म्हणजे "त्रास देणारे" ,आता या शोषीत आणि पीडीत ज्याना हे कंटक त्रास देत असत ते कोण असू शकतील, आता या जातीच्या उतरंडीतील तळातल्या भुताना फक्त उच्च वर्णीयच त्रास देत असत , नाहीतर संत तुकारामानी इथे भुतांचे पालन असे शब्द वापरले नसते . जर संत तुकारामाना कंटक हा शब्द येथील सर्व स्थानीकाना त्रास देणाऱ्या मुघलांबद्दल बोलायचा असता तर त्यानी "दया तिचे नाव , मरहट्ट्यांचे पालन" असे म्हटले असते , कारण त्याकाळी महाराष्ट्रातील स्थानिकांना "मरहट्टा" हा सर्वसमावेशक शब्द होता . आता या अभंगातून असे दिसून येते कि, या संत तुकारामाना ही जातीच्या उतरंडीची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या शोषणाचा अनूभव आलेला असावा .
या जातीच्या शोषणातून वामणाने बळी राजाची हत्या केली असावी ,याची जाणीव संत तुकाराम याना असावी . त्यामुळेच संत तुकाराम स्वत:ला "बळी राजाच्या" कार्याचा आणि विचारांचा वंशज समजत .

संत तुकाराम पुढे म्हणत .
तुका म्हणे आम्ही बळी |
जीव दिला पायातळी || 
       
- प्रमोद शिंदे 

 (९९६७०१३३३६)