Friday, September 25, 2015

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय ...


हा एक शोक आहे महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या  एका शेतकऱ्याच्या बायकोचा , तिच्या नवऱ्याने आत्महत्या केल्यावर जेंव्हा मंत्री आणि राजकारणी तिच्या कडे सांत्वनाला येतात . तेंव्हा ती अशा प्रकारे आपला शोक प्रकट करेल ,  ते मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .  

 

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय ...

 

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय  

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

माझ्या बा ची मी लाडकी पोर

लग्नाला आली , जीवाला घोर

लावून दिलं लगीन , शेतकऱ्याच्या पोराशी

मातीचं नातं, जुळवलं मातीशी

तीच माती माझी वैरीण झाली बघा

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

नवरा माझा शेतात राबायचा,

सानच्याला येवून पिरमानं बोलायचा

पोरांना शिकवीन , साळत घालीन

कलेक्टर करीन , असं म्हणायचा

बा मेला , पोरं माझी पोरकी झाली  

खायला काय नाय, आश्रम शाळेत धाडलीत बघा  

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

 

यंदा पाऊस आला तर , शेत आपलं फळल

तुला लुगडं अन आयला पातळ मिळल

पोरास्नी कपडा अन मला धोतर मिळल

चूल माझी मोडली, शेत माझं सुकलं

दुपार पेरणी साठी , डोरलं भी मोडलं बघा

वाघासारखा माझा धनी , शेळी सारखा मेला बघा

अरे रडताय काय ? कुंकू माझं फासावर गेलंय  

पोटासाठी मेलंय बघा , माती साठी मेलंय बघा

-    प्रमोद शिंदे (९९६७०१३३३६)

२५ -०९ -१५

No comments:

Post a Comment