Thursday, July 30, 2020

गावाकडच्या गोष्टी- भाग 3

गावाकडच्या गोष्टी - भाग 3

शेठ गावाच्या पारावर दोन्ही पायाची कमरेत घडी करून गुडघे छातीला चिटकवून झाडाला टेकून हातात बारीक काडी घेऊन दात कोरत बसले आहेत. एवढ्यात दोन जण धावत धापा टाकत येतात. 
दोघे एकत्र : शेठ... शेठ.. शेठ.. 
शेठ :काय झाले? कायले ओरडून राहिले? 
(पहिला ज्याचे नाव नरसिंग आहे.) नरसिंग : शेठ आनंदाची बातमी आहे, आपल्या गावावर हल्ला झालाय?  आपले 20 गावकरी मारले गेले. 
शेठ :म्हणजे? 
नरसिंग : तुम्ही महान आहात, काय डोकेलिटी हाय तुमची, दरवळे प्रमाणे बिरवी पाड्याच्या निवडणुकी आधी बरोबर हल्ला.. वा वा 
शेठ : पन मी काय केलंच नाय, या वेळी त्या बाजूच्या इमाम ला सांगणार होतो, पन त्या येड्यानं  सांगायच्या आधीच केलं की काय? छान,  चला माझ्या ऍक्टिंग ची वेळ आली, चला स्क्रिप्ट लिहा, धुमाळ ला सांगून बॅटिंग ची तयारी करा. 
दोघे : आं? 
शेठ : बॅटिंग बॅटिंग.. स्ट्राईक रे 
नरसिंग : हम्म हॅम,  ते करू हो, त्याला थोडीच वेळ लागतोय, फक्त शब्द बदलायचेत, इथले तिथे, अन तिथले इथे, हो पन आता उजवीकडच्या इमाम च्या लोकांनी नाय तर डावीकडच्या चाणर गावच्या लोकांनी केलाय हल्ला ! 
(त्या चौघात दुसरा घावडेकर नावाने आहे.)
घावडेकर : शेठ, मानलं हा तुम्हाला,  त्या इमाम नंतर तुम्ही चाणर च्या पिंगपिंग ला पन आपल्या सोबत घेतलात. 
हे ऐकताच शेठ पटकन उभे राहतात, त्यांचे पाय लटपटू लागतात. 
शेठ : श्या.... म्या...... श्या..... म्या... श्या श्या श्या (मोठ्याने ओरडू लागतात.)
सगळेच : काय झालं? काय झालं? 
शेठ : ये गपा... श्या श्या... 
एवढ्यात मागच्या शेतातून टमरेल हातात घेऊन श्या.. म्या बाहेर येतो. 
श्याम्या :काय झालं? कायले बोंबलून राहिला बे !
शेठ : बे? 
श्याम्या : हं सॉरी, जुनी दोस्ती ? 
शेठ : हम्म... इथे नाय (डोळे मोठे करत )
शेठ :अरे तू शेतात का गेलास, तु आता घरसंत्री आहेस, इंग्लिश दिलंय ना तुझ्या मोरीत बसवून? 
श्याम्या : अरे तुला माहित नाय का? जुन्या लफड्यात जेलात होतो  तवा लय सुजलाय, तिथली सवय जात नाय खाली बसायची. माझं जाऊदे तू बोल काय झालं? 
शेठ : अरे त्या पिंगपिंग ने हल्ला केलाय, 
श्याम्या : करुदेत, त्या तात्याचं अन त्याचं जुनं झेंगाट हाय !
शेठ : अरे त्यानं तात्यांवर नाय, आपल्यावर, आपल्या गावावर हल्ला केलाय.
(आता हे ऐकून श्याम्याचेही पायही थरथर कापू लागतात.)
नरसिंग : ते गावांत घुसलेत, आपली 20 माणसे मारली, काहींना डांबलाय, म्हणत्यात, मागच्या गल्लीतलं खोरं त्यांचं हाय? 
श्याम्या : अरे तो धुमाळ कुठाय? वरच्या आळीतल्या मिटिंग नंतर कुठं दिसलाच  नाय, कुठाय शोध.  
नरसिंग : शोधतो, भेटल्यावर काय सांगू?  सांगू का स्ट्राईक कर म्हणून.. 
शेठ : अरे काय बोलतो तू? माझे पाय अन हाथ बघ! कसे हलत्यात...अन तू अजून फाड माझी ! अरे चर्चा करायला पाहिजे ! जा..
श्याम्या : कुणा कुणाला माहिताय हे ? 
घावडेकर :समद्या गावाला !
शेठ :कसं? 
घावडेकर : या नरसिंग ने पेपर अन केबल वाल्याला सांगून टाकलं, पिंग पिंग वाले गावात वेशीच्या आत घुसले, 20 मारले, काही पकडले !
शेठ : अरे काय हे... काय अक्कल हाय का नाय? कायला बोंबललास? 
नरसिंग : मला वाटलं, तुम्हीच करवलात, मधल्या पाड्याच्या इलेक्शन साठी, म्हटलं,  तुम्ही शाबासकी द्याल.. म्हणून बोललो !
शेठ : तुझ्या............( बीप)
श्याम्या : शेठ शेठ थांबा, सेन्सॉर आहे...
शेठ : श्याम्या... श्या, आता काय करायचं?   मागच्या वेळेस पन त्यांनी हल्ला केला, तवा मी तुमची बुलेट गाडी अन पाटलांचा पुतळा घेतो असे पाय पकडून सांगितलं तेंव्हा ते थांबले.
पन कुणाला हे कळू दिलं नाही.
पन आता तर पाय सोडा... काय पकडायला लावतो तो पिंग पिंग कुणास ठाऊक? 
श्याम्या : शेठ घाबरू नका, मी आहे ना? करूयात काय तरी !
(विचार करत,  मग अचानक सुचल्यासारखं) हम्म, शेठ, पहिलं तुम्ही आपल्या पेपर आणि केबल वाल्याना सांगा, पिंग पिंग आपल्या वेशीच्या आत आलाच नाय !
नरसिंग :पन मी बोललो ना? 
श्याम्या : तुला कोण विचारतो का? तू गप्प.. आपल्या सगळ्या चड्डिधारी अन भक्तांना सांगा पिंग पिंग चा सामान घेऊ नका, पिंग पिंग चे पुतळे जाळा. लोक हे करतील, थोडी उसंत मिळेल.
आपल्या केबल आणि पेपर वाल्याना सांगा बातम्या लावा, "आपल्याला सगळेच सपोर्ट करतायेत, पिंग पिंग एकटा पडलाय ! तात्या असं बोलला, मामा असं बोलला,  लिहायला सांगा. पिंग पिंग घाबरला लिहा." 
अन शेठ, तुम्ही सांगायचं, पिंग पिंग ची माणसं गावाच्या वेशीत आलीच नाय, आली तर आम्ही सोडणार नाय! शांत बसणार नाय ! 
घावडेकर :  पन आपल्या विरोधात असलेल्यानी खरं सांगितलं तर? 
शेठ : सांगायचं? अशा वेळेस राजकारण नका करू, (हसत हसत) या शेठ चा अपमान म्हणजे गावाचा अपमान, गावातल्या समद्यांचा अपमान... हा हा हा (चौघे हसतात.)
श्याम्या तूचं माझा खरा मैतर.. 
(दोघे मिठी मारतात )
क्रमश... 
- प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी 
(वरील चर्चेचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी,  स्थळाशी, काळाशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा. )

No comments:

Post a Comment